कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ७ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.पुरस्कारामध्ये नवनाथ गोरे (निगडी बुद्रुक, जि.सांगली), प्रमोद बोरसरे (गडचिरोली), रावसाहेब कुवर (साक्री, जि.धुळे), श्रीनिवास मस्के (बरडशेवाळा, जि.नांदेड), डॉ.श्रीकांत नरुले (कोल्हापूर) या लेखकांचा समावेश आहे. ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०१७ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये फेसाटी-नवनाथ गोरे (ग्रामीण कादंबरी-अक्षर वाड्मय प्रकाशन, पुणे), पारवा-प्रमोद बोरसरे (ग्रामीण कथासंग्रह- हरिवंश प्रकाशन, चंद्रपूर), हरवल्या आवाजाची फिर्याद (विभागून)-रावसाहेब कुवर (ग्रामीण कवितासंग्रह-काव्याग्रह प्रकाशन, वाशिम), गावभुईचं गोंदण (विभागून) श्रीनिवास मस्के (ग्रामीण कवितासंग्रह-सूर्यमुद्रा प्रकाशन,नांदेड), जगदीश खेबुडकरांच्या लावण्या-डॉ.श्रीकांत नरुले (ग्रामीण समीक्षा-प्रतीक प्रकाशन, पुणे) प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी ५ हजार १ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कविता या साहित्य प्रकारामध्ये हा पुरस्कार दोन साहित्यकृतींना विभागून देण्यात आला आहे.या वर्षीच्या पुरस्काराचे वितरण कोपरगावचे माजी आमदार व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.के.बी.रोहमारे यांच्या २० व्या स्मृतिदिनी सर्जनशील लेखक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्या हस्ते व के.बी.रोहमारे यांचे स्नेही,ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी रघुनाथराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालया येथे केले जाणार आहे, असेही रोहमारे यांनी सांगितले.
गोरे, बोरसरे, कुवर, मस्के, नरूले यांना भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 3:40 PM