सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सर्वात मोठा पाझर तलाव यावर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कापरी नदी प्रवाहित झाली आहे.
दोन्ही बाजूला असणाºया डोंगरालगत नदीवर बंधारा बांधला आहे. तसेच गोरेगाव तलावात पाणी साठले आहे. यामुळे आजूबाजूला परिसर निसर्गरम्य झाला आहे. तलाव परिसराला एखाद्या पर्यटन स्थळासारखे वैभव प्राप्त झाल्याचे दिसू लागले आहे.
१९७२ सालच्या दुष्काळात गावातील सर्व लोकांना दीर्घ काळ रोजगार देण्याच्या उद्देशाने तत्कालीन आमदार कै.शंकरराव काळे यांच्या प्रयत्नातून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या कामास मंजुरी मिळाली होती. गोरेगावकरांना या तलावाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला होता. पाणी अडवल्याने क्षेत्र ओलिताखाली आल्याने शेतकºयांना आर्थिक सुबत्ता आली.
असे असले तरी अलीकडच्या पाच वर्षात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. यावर्षी आषाढ श्रावण महिन्यातील पावसातील सरींनी हा तलाव ओसंडून वहात आहे.