अहमदनगर : तिसर्या श्रावणी सोमवारची पर्वणी साधत भाविकांनी नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गड येथील गोरक्षनाथ आणि डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळपासून अभिषेक, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथ मूर्तीला आणि रामेश्वर मंदिरात महादेवाला आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते अभिषेक झाला. यावेळी मांजरसुंबा येथील सरपंच जालिंदर कदम, गोरक्षनाथ कदम, जयराम कदम, तुकाराम कदम आदी उपस्थित होते. रामेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमास वांबोरीचे सरपंच उदय पाटील, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे आदी उपस्थित होते. डोंगरगण मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. गोरक्षनाथ गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन आमदार कर्डिले यांनी दिले.दिवसभर भाविकांची गर्दी, प्रसाद व पूजा साहित्याची दुकाने परिसरात थाटली होती. भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी या भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
गोरक्षनाथ गड, डोंगरगणला भाविकांची गर्दी तिसरा श्रावणी सोमवार
By admin | Published: August 31, 2015 9:30 PM