अहमदनगर : जिल्हयात गॉस सिलेंडरचा दर आठशे रुपये, तर पेट्रोलचा दर ९७ रुपयांपर्यंत पोहचला आहे. पेट्रोलचे शतक पार करण्यासाठी आता तीन रुपये बाकी आहेत. पेट्रोलपाठोपाठ, गॉस दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. घरामध्ये फोडणीसाठी आवश्यक असलेल्या गोडतेलाची दरही चांगलेच भडकले आहेत.
पेट्रोल व डिझेल दरदिवशी २५ पैशांनी वाढत आहे. नगर शहरात सध्या पेट्रोलचा दर ९६ रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आठ दिवसात पेट्रोलचा दरही शंभरीकडे जाण्याची शक्यता आहे. डिझेलनेही ८६ रुपये पार केले आहेत. या दरवाढीपाठोपाठ १५ फेब्रुवारीला गॉस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी हा दर ७३२ रुपये ५० पैसे असा होता. त्यामध्ये वाढ होवून तो आता ७८२ रुपये ५० पैसे इतका झाला आहे. ही किंमत घरपोहच गॉस सिलेंडरची असली तरी सिलेंडर देणारे १० ते १५ रुपये घेतात किंवा दिले जातात. ग्रामीण भागातही वाहतुकीचा खर्च समाविष्ट केल्यानंतर ही किंमत आठशे रुपयांपर्यंत जाते.
दरम्यान काही किराणा मालाचेही दर वाढले आहेत. त्यामध्ये गोडतेल ५ ते १० रुपयांनी वाढले आहे, तर तूरदाळही १० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
------------
असे आहेत सध्याचे दर
पेट्रोल- ९६.६८ रुपये प्रति लिटर (पंप १)
पेट्रोल-९६.४१ रुपये प्रति लिटर (पंप २)
डिझेल-८१.७० रुपये प्रति लिटर (पंप १)
डिझेल-८६.४१ रुपये प्रति लिटर (पंप २)
गॉस सिलेंडर- ७८२.५० रुपये (प्रति सिलेंडर)
तूरदाळ-११० रुपये किलो
गोडतेल- १४० रुपये पिशवी (एक किलो)
------
ग्रामीण भागासाठी गॉस वाहतूक दर
गॉस कंपन्यांनी निश्चित करून दिलेले जे दर आहेत, तेच दर नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात कायम राहतील. ग्रामीण भागात मात्र एजन्सीपासून ६ ते १० कि.मी.साठी २० रुपये,११ ते २० कि.मी.साठी २५ रुपये, २१ ते ३० कि.मी. साठी ३० रुपये,३१ कि.मी.च्या पुढे ५० रुपये असा वाहतूक दर निश्चित पुरवठा विभागाने निश्चित केला आहे.
----------------
पूर्वी गॉसची दरवाढ ही एक तारखेला व्हायची. मात्र सध्याच्या स्थितीत कोणत्याही तारखेला गॉस सिलेंडरचे दर वाढू शकतात. वेगवेगळ्या शहरात सिलेंडरचे दर वेगवेगळे आहेत. या महिन्यात एकदाच ५० रुपयांनी गॉसचे दर वाढले आहेत.
-राजावत, सेल्स ऑफिसर, गॉस कंपनी
----------