बाळासाहेब काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा : राजकीयदृष्ट्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. येथील मतदारांनी अनेकदा राजकीय दिग्गजांना डावलत त्यांच्या मनातील उमेदवारांनाच आमदार केले आहे. या मतदारसंघातील सन १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत असाच एक राजकीय चमत्कार घडला होता. त्याची आजही राजकीय वर्तुळात चर्चा होते.
मूळचे शेवगाव येथील असलेले गांधीवादी विचारांचे नेते बाबूराव भारस्कर यांना सन १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यावेळी अवघे १०० रुपये खर्च करून आणि सायकलवर प्रचार करून ते आमदार झाले होते. १९७२ च्या निवडणुकीत मात्र भारस्कर यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. मात्र, भरलेला अर्ज त्यांना मागे घेता न आल्याने भारस्कर यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. तरीही श्रीगोंदेकरांनी भारस्कर यांनाच विजयी केले.
श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी कर्जत तालुक्यातील मिरजगाव गटाला जोडलेला होता. या गटातील २८ गावे या मतदारसंघात होती. तसेच हा मतदारसंघ सन १९६२ ते १९७७ दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. दरम्यान, भारस्कर यांनी पहिली निवडणूक ही सायकलवर प्रचार करून लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर रोहन यांचा ५ हजार ५२९ मताधिक्यांनी पराभव केला होता. १९६७ च्या निवडणुकीत भारस्कर यांना काँग्रेस पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी रिपाइंचे ए. जी. शिंदे यांचा ७ हजार १२४ मतांनी पराभव केला. १९७२ मध्ये पक्षाने भारस्कर यांना उमेदवारी नाकारत ती प्रभाकर शिंदे यांना दिली. त्यांचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते तर भारस्कर हे अपक्ष असल्याने त्यांना सायकल हे चिन्ह मिळाले होते. पक्षादेशानुसार भारस्कर यांनी या निवडणुकीतून माघार घेत शिंदे यांचा प्रचार केला. मात्र, निकाल लागला तेव्हा शिंदे यांना १५ हजार १९२ तर भारस्कर यांना १९ हजार ८५३ मते मिळाली होती.
सायकल, मोटारसायकलवरून प्रचार
आमदार असूनही बाबूराव भारस्कर यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. निवडणुकीत ते कधी सायकल तर कधी स्थानिक नेत्यांच्या मोटारसायकलवर बसून प्रचार करायचे. त्यांना समाजकल्याण मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मुंबईतून तार आली. त्यावेळी मामलेदार लोणीव्यंकनाथला ही तार घेऊन आले. यावेळी भारस्कर यांच्याकडे कपडे घेण्यासाठीही पैसे नव्हते. श्रीगोंदा फॅक्टरी येथील कान्होजी जंगले यांनी त्यांना कपड्यासाठी १०० रुपये दिले. त्यानंतर ते कपडे घेऊन शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले.