अहमदनगर : राज्यातील १२ वर्षाखालील सर्व मूकबधिर मुले दत्तक घेतली असून त्यांना शोधून त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शासन यंत्रणेबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून त्यांना महागडे उपचारही मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आयोजित ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.विविध आजारांनी ग्रस्त असणा-या आणि महागड्या आरोग्यसेवा परवडत नसलेल्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार करुन घेण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील शांतीनिकेतन क्रीडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिरास प्रारंभ झाला.महाजन म्हणाले, आतापर्यंत तालुका अथवा जिल्ह्याच्या पातळीवर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रथमच राळेगणसिद्धीसारख्या ग्रामीण भागात हे शिबिर झाले. येथे मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातील. ज्यांच्यावर पुढील उपचार अथवा शस्त्रक्रिया आवश्यक आहेत, त्यांच्यावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यामुळे हे शिबिर केवळ एका दिवसापुरते नसून येथे नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल व त्यांच्यावरील सर्व उपचार मोफत करण्यात येतील. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांशी जोडले गेल्याचा अनुभव येत आहे. ग्रामीण भागात या शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच विविध संस्था-संघटना, सेवाभावी कार्यकर्ते, विद्यार्थी, शिकाऊ डॉक्टर्स परिश्रम घेत होते. आजच्या या गर्दीने त्यांच्या परिश्रमाला यश आल्याचे समाधान वाटत आहे, असे महाजन म्हणाले.
नामांकित डॉक्टरांची उपस्थिती
आयुषचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डीएमईआरचे संचालक प्रवीण शिनगारे, पद्मश्री डॉ. के.एच. संचेती, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. शेखर भोजराज, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. गौतम भन्साळी, रागिनी पारेख, महाराष्ट्र आयुर्वेद कौन्सीलचे अध्यक्ष, डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म्हैसेकर, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.पी. बोरुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी आदींची शिबिराच्या उदघाटनप्रसंगी उपस्थिती होती. त्यांनी डॉक्टर, रुग्णांशी संवाद साधला.