जामखेड : तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देऊ, कुटुंबातील एका सदस्याला साखर कारखान्यात नोकरी देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दत्तात्रय अडसूळ यांच्याकडे खासगी सावकार व घोडेगाव सेवा संस्थेचे ८० हजारांचे कर्ज होते. यासाठी होणाऱ्या तगाद्यामुळे त्यांनी कारखान्याची ऊसतोड सोडून ते गावी आले होते. खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे जिरायत पावणेतीन एकर शेत विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु, सौदा फिसकटल्याने हताश होऊन अडसूळ यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. मात्र प्रशासन निवडणूक यंत्रणेत व्यस्त असल्याने त्यांच्याकडे कोणी फिरकले नाही. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त दिल्यानंतर प्रशासनाने अडसूळ यांच्या घरी जाऊन पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी कुटुंबाचे फोनवरून सांत्वन केले होते व १४ जानेवारीला भेट देण्याचे मान्य केले होते.
त्यानुसार पवार यांनी गुरुवारी येथे भेट दिली. यावेळी माउली भोंडवे, प्रा. लक्ष्मण ढेपे, गणेश पाटील, बापू भोंडवे, आदी उपस्थित होते. पवार यांनी कुटुंबाला शासकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. तसेच कुटुंबातील एकजणाला साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याबाबत आश्वासन दिले.
फोटो : १४ रोहित पवार
घोडेगाव (ता. जामखेड) येथे अडसूळ कुटुंबीयांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केली.