लोणी: राज्यातील आघाडी सरकारने ग्रामीण भागाचा मोठा विकास केला़ शेतकरी हिताचे निर्णय घेतले़ विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत सुविधा आणल्या आहेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले़राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ७५ लाख रुपये खर्चाच्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण व नारी भवनाचे उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते़ विखे म्हणाले, राज्यात आघाडी सरकारच्या कामामुळे ग्रामपंचायती सक्षम झाल्या़ गावाच्या विकासाचे अधिकार ग्रामसभेला दिले म्हणूनच सचिवालयासारख्या इमारती उभ्या राहिल्या़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे गावे स्वच्छ झाली़ शौचालये उभी राहिली़ खेडेगावात ई-सुविधा केंद्र सुरु झाली़ या केंद्रांमध्ये १६ प्रकारचे दाखले मिळू लागले़ त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला़ लोणीसाठी ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्यात असून, २०३० सालापर्यंत १ लाख लोकसंख्या गृहित धरुन ही योजना साकारली जात असल्याचे विखे यांनी सांगितले़ यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार सुभाष दळवी, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे, लोणीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, जि़प़सदस्य रावसाहेब साबळे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, सरपंच शारदा तुपे, उपसरपंच कांतादेवी आहेर, सदस्या पुष्पा आहे, शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, नंदुशेठ राठी, बापूसाहेब आहेर, उत्तम घोगरे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)लोणी येथील दशक्रियाविधी घाटावर महिलांसाठी चेजिंगरुम उभारण्यासाठी ज्ञानदेव, बाळासाहेब, दिलीप या आहेर बंधुंनी त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांचा धनादेश विखे यांच्याकडे सुपूर्द केला़ यावेळी विलास घोगरे, निशीकांत घोगरे यांनी जनसेवा मंडळात प्रवेश केला़ कृषी व पणन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी व पणन निर्देशिकेचे प्रकाशन विखे यांच्या हस्ते करण्यात आले़ पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान होत आहे़ हा दिवस सहकारी चळवळीतील ऐतिहासिक दिवस आहे़ यामुळे सहकार क्षेत्राला मोठी बळकटी मिळेल़- राधाकृष्ण विखे, कृषी व पणनमंत्री.
सरकारने ग्रामीण विकास साधला
By admin | Published: August 29, 2014 11:24 PM