अहमदनगर : दररोज निघणा-या परिपत्रकांमुळे शिक्षण विभाग गोंधळात आहे, असे सांगून शिक्षणात राज्य सरकारचा हस्तक्षेप अलिकडच्या काळात वाढला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी केला.नगर जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणा-या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, जि़ प़ अधक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले आदी यावेळी उपस्थित होते.शिक्षकांना आज स्वतंत्र भूमिका सरकार घेऊ देत नाही. रोज निघत असलेल्या परिपत्रकामुळे शिक्षक पुरता गोंधळला असून, त्यांना यातून बाहेर काढणे गरजचे आहे. या गोंधळामुळे त्यांना शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. परिणामी शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहतो आहे, असे विखे यांनी सांगितले.
निबोडी शाळेच्या प्रस्तावाला महिनाभरात मंजुरी- शिंदे
नगर तालुक्यातील निंबोडी येथील घटना दुर्दैवी आहे. जिल्हा परिषदेने निंबोडी शाळेचा १ कोटी २६ लाखाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे, त्यास येत्या महिनाभरात मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.