राहाता : कोरोना संकटाच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कृषि व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतक-यांच्या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीने लॉकडाऊनच्या काळातही शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था ही शेतक-यांना दिलासा देणारी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासन नियमाचे पालन करुन शेतक-यांचा उत्पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील शेतक-यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ.राधाकृष्ण विखे यांनी रविवारी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिका-यांची सदिच्छा भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या व्यवस्थापनासमोर असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. समितीत आलेल्या कांदा पिकाची पाहाणी करुन मिळत असलेल्या भावाबाबतही त्यांनी जाणून घेतली.कोरोनाने संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला म्हणूनच शेती उत्पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतक-यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. शासनाच्या पणन विभागाची निष्क्रीयता याला कारणीभूत ठरली. शासनाच्या अखत्यारीत येणाºया एकाही व्यवस्थेने शेतक-यांचा उत्पादीत माल खरेदी करण्याची इच्छाशक्ती दाखविली नाही. शासनाने शेतक-यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्या पणन विभागाला याचे महत्व समजले नाही. राज्यातील बाजार समित्या नियोजनपूर्व सुरु ठेवल्या असत्या तर शेतकºयांना बाजारपेठ मिळाली असती. सध्या उपलब्ध असलेला भाजीपाला शेतक-यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही. कांदा उत्पादकांनीही उत्पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्यामुळे भविष्यात भाजीपाल्याबरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती विखे यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनमध्ये सरकारची पणन व्यवस्था अपयशी : राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 11:27 AM