अहमदनगर : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. यातून सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर मात्र नगर जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम मात्र सुरूच आहेत.कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.९ मार्च) सकाळी ११ वाजता महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शासकीय असला तरी याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात १५ जण निरीक्षणाखाली आले आहेत. २३० जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबई, पुणे आंतरराष्ट्रीय विमानांमधील ९६ हजार ४९३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. त्यांचे स्क्रिनिंग सुरू आहे. केंद्राच्या सूचनेप्रमाणे यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिर्डी, शिंगणापूर, मढी, मोहटा अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही गर्दी टाळण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेने केले आहे. असे असले तरी मंत्र्याचे दौ-यांचे, मेळावे, बैठका आदी शासकीय कार्यक्रम सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यक्रम सुरू असल्याबाबत नागरिकात नाराजी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही शासकीय कार्यक्रम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:28 PM