शेवगाव : राज्य सरकारने बारावी वगळून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शालेय वर्ष समाप्त झाल्याचे घोषित करून, ऑनलाईन अध्यापनास पूर्णविराम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षक परिषदचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाहक शिवनाथ दराडे, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी दिले आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे शेवगाव तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली. कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून शाळांना सुटी जाहीर केली आहे. प्रत्यक्ष शालेय अध्यापन बंद करण्यात आले होते. मात्र दरम्यान शासनाने ऑनलाईन अध्यापनचे आदेश जारी केले होते. १५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असून ऑनलाईन शिक्षक अध्यापन करीत होते. त्यानंतरही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाईन अध्यापन सुरूच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वर्गोन्नत्ती देण्याचे सूचित केले आहे. उन्हाळी सुटी, गणपती सुटी, दिवाळी सुटी तसेच नाताळच्या सुटीत ऑनलाईन वर्ग सुरू होते. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी संगणक व अध्ययन अध्यापन केल्यामुळे डोळ्याचा व मानेचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर, राज्य सरकारने ९ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
अशीच मागणी शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर, शरद दळवी, जिल्हा सचिव चंद्रकांत चौगुले, तुकाराम चिक्षे, किशोर दळवी, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, शशिकांत थोरात, विनायक कचरे, सतीश जगदाळे, बाबासाहेब बोडखे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरुडे, किरण शेळके, मुकुंद अंचवले, अनिल दरंदले, संदीप झाडे आदींनी केली आहे.