अहमदनगर : बहुचर्चित निंबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामास जिल्हा परिषदेने गुरुवारी कार्यारंभ आदेश दिला आहे. जुन्या शाळेपासून जवळच असलेल्या जागेत १४ खोल्यांची नवीन इमारत पुढील सहा महिन्यांत बांधून पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे.निंबोडी येथे सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. ठेकेदार नलगे यांना काम सुरू करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले आहेत. जुन्या शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जागेत १४ शाळा खोल्यांसह संरक्षण भिंत आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात येतील. बांधकाम विभागाकडून लवकरच गावातील जागा ताब्यात घेऊन स्वच्छता केली जाणार आहे.निंबोडी येथील दुर्घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला. तसेच भिंत अंगावर कोसळून पाचवीच्या वर्गातील १४ मुले जखमी झाली. या दुर्घटनेला वर्ष उलटून गेले़ नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मुले शाळेत दाखल होऊ लागली. पण, नवीन शाळेची एक वीटही प्रशासनाने चढविली नाही. त्यामुळे शाळा सुरू होतानाच पर्यायी जागेत भरविण्यात आली. ‘लोकमत’ ने निंबोडीची शाळा विठ्ठलाच्या दारी, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील लालफितीचा कारभार चव्हाट्यावर आला़ त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली़ जिल्हा परिषदेने तातडीने संबंधित ठेकेदाराला बांधकाम सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे निंबोडी शाळेचा प्रश्न मार्गी लागला आहे. शाळेचे बांधकाम रखडल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे व अध्यक्षा शालिनी विखे यांच्यात राजकीय वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी आरोप झाले. अखेर निंबोडीच्या शाळेच्या बांधकामाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्याने हा वाद निवळला आहे.
निंबोडी शाळेच्या बांधकामावर अखेर सरकारी मोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:03 PM