अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे; परंतु सरकारकडून उपाययोजना करण्यास कमालीचा विलंब होत असल्याचे सांगून मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे सरकार पुरते गोंधळले आहे, असा आरोप भाजपचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी शुक्रवारी येथे केला.
बुऱ्हाणनगर येथील आरोग्य केंद्रास कर्डिले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, की कोरोना संसर्गात नगर जिल्हा धोकादायक वळणावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य संदर्भातील जलद गतीने विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राहुरी मतदारसंघातील नगर तालुका, पाथर्डी तालुका व राहुरी तालुक्यामधील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करावेत. जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तालुक्यातील मोठ-मोठ्या बाजारपेठांच्या गावांमध्ये कोरोना सेंटर व चाचणी केंद्र सुरू करावेत. दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक गावामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण भागातही आता कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे निदर्शनात येत आहे. मंत्र्याचे गोंधळ चव्हाट्यावर येत असल्यामुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. एकामागून एक मंत्र्यांना आपल्या पराक्रमामुळे राजीनामा देण्याची वेळ येत आहे. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्यामुळे कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यास वेळ लागत असल्याचे कर्डिले म्हणाले.