राळेगण सिद्धी : शेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. सरकार आश्वासन देऊनही त्याचे पालन करीत नसल्याने आपण पुन्हा महात्मा गांधी जयंतीपासून राळेगण सिद्धी येथे उपोषण आंदोलन करीत असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्राद्वारे दिला.२३ मार्चपासून नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी शेतक-यांचे प्रश्न व लोकपाल, लोकायुक्त संदर्भात केंद्र सरकारने ११ मुद्यांवर लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते. त्यावर आश्वासनांची पुर्तता होण्यासाठी सहा महिन्यांची वाट पाहू अन्यथा पुन्हा उपोषण करणार असल्याचे आपण सांगितले होते. आश्वासनानंतर ५ महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रिय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दि. २९ आॅगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे लोकपाल, लोकायुक्त कायदा २०१३ बाबत सरकार काय करीत आहे याची माहिती दिली. परंतु, लेखी आश्वासनातील ११ मुद्यांतील शेतक-यांच्या शेती मालाला स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव देणे, वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकरी, शेतमजूर यांना किमान ५ हजार रुपये पेन्शन मिळावी. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी. लोकपाल व लोकायुक्त कायद्यातील कलम ६३ व कलम ४४ मधील दुरूस्ती संशोधन मागे घेणे बाबत प्रत्येक राज्यात लोकायुक्ताची स्थापना व्हावी याबाबत काहीच उल्लेख नाही. हे प्रश्न काही वैयक्तिक अण्णा हजारेंचे नाहीत. ते जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे हे सरकारचे कर्तव्य असल्याने आपण या प्रश्नी आग्रही आहोत. सरकार आश्वासनांचे पालन करीत नसल्याने येत्या गांधी जयंतीपासून राळेगण सिद्धी येथे आपण उपोषण आंदोलन करणार आहोत, असा इशारा हजारे यांनी दिला.
जनतेचे प्रश्न सोडविणे सरकारचे कर्तव्य : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 4:33 PM