(डमी)
श्रीरामपूर : समाजातील निराधार, अपंग, विधवा महिलांकरिता राज्य सरकारने दिलेल्या अनुदान स्वरूपातील मदतीचे ४३ कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटात गरिबांना आधार देण्याचा सरकारचा याद्वारे प्रयत्न आहे.
सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत महिन्याला एक हजार रुपये अनुदान लाभार्थ्याला दिले जाते. लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे सरकारने मे महिन्याचे अनुदानाचे पैसे एप्रिल महिन्यात आगाऊ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, एप्रिल व मे महिन्याचे दोन हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय अनुदानाची मागणी लक्षात घेऊन पैसे वितरित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली आहे. लवकरच पैसे लाभार्थ्यांच्या हाती पडतील, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात एक लाख ७० हजार ४०१ लाभार्थ्यांना ४३ कोटी ७६ लाख १८ हजार ४०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे समाजातील वृद्ध, निराधार, दिव्यांगांना आधार मिळाला आहे.
----
योजनानिहाय अनुदान
संजय गांधी निराधार योजना : ९ कोटी ६३ लाख
श्रावणबाळ योजना : ३२ कोटी रुपये
इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन : एक कोटी ७६ लाख
राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना : ११ लाख ७३ हजार.
दिव्यांग निवृत्ती वेतन योजना : ५५ हजार २०० रुपये.
-----
कुटुंब लाभ योजनेला २५ लाख रुपये
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्रीचे निधन झाल्यास, त्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीपोटी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहेत.
-----
सरकारकडून मिळणारे मदतीचे एक हजार रुपयांचे अनुदान तुटपुंजे आहे. विशेषतः कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेला अडचणींना सामोरे जावे लागते. एक हजार रुपयांमध्ये कुटुंबाचा खर्च भागवता येऊ शकत नाही. मला स्वतःला दोन हजार रुपये घरभाड्यासाठी भरावे लागतात.
रिमा राजेंद्र रानडे, लाभार्थी.
----
केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या संकट काळात जनतेला वाऱ्यावर सोडू नये. किमान सन्मानाने जीवन जगता येईल, अशा स्वरूपाचे आर्थिक साहाय्य करावे. एक हजार रुपये मदत किंवा एका व्यक्तीला महिन्याला पाच किलो धान्य ही गरिबांची थट्टा आहे.
जीवन सुरुडे, असंघटित कामगार व शेतमजूर संघटना, श्रीरामपूर.