जामखेड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद उर्फ स्वामी गायकवाड (वय २०, रा. तेलंगशी) यास जामखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. मुजावर यांनी शुक्रवारी १० मे पर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.गायकवाडला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवार ३ मे रोजी मांडवगण फराटा (ता. शिरूर जि. पुणे) येथून सहभागी असलेल्या एका अल्पवयीन आरोपीसह अटक केले होते. त्यास पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात जामखेडच्या न्यायालयात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास आणले होते. न्यायालयात युक्तिवाद करताना तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी गायकवाडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. सहायक सरकारी वकील रमाकांत भोकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने क्रूर हत्या केली आहे. या गुन्ह्यात दोन पिस्तूल व मोटारसायकल वापरले गेले आहेत. आरोपींकडून ते हस्तगत करायचे आहे. दोन पिस्तूल व काडतुसे कोठून आणली?, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे? या सर्व बाबींच्या सखोल तपास करण्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.न्यायालयाने आरोपीला वकील द्यायचा आहे का? असा प्रश्न विचारला असता तो निरूत्तर होऊन काहीच बोलला नाही. यानंतर न्यायालयाने गायकवाडला सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.