अहमदनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण सवलतीच्या दरात जूनमध्ये होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ निर्बंध लागू करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. याच योजनेतील धान्य मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने आता केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात हे धान्य दिले जाणार आहे.
राज्य सरकारने अन्नधान्य मोफत वाटण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या लॅाकडाऊनमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब, अंत्योदय योजनेसोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रति व्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. बऱ्याच जिल्ह्यांत आधीच्या मोफत योजनेतील धान्य शिल्लक असून, धान्याची उचलही झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच शासनाने आता हे धान्य केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात देण्याचे जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी २९२ मेट्रिक टन तांदूळ तर ४३९ मेट्रिक टन गहू असे ७३१ मेट्रिक टन एकूण धान्य उपलब्ध होणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
-----------------------
जिल्ह्यातील रेशनकार्डधारक
अंत्योदय योजना- ८८,६१८
प्राधान्य कुटुंब-६,०५,५२४
केशरी-३,३५,६६०
-------------
काय मिळणार?
प्रतिमाणसी
गहू-१ किलो (८ रुपये किलो)
तांदूळ-१ किलो (१२ रुपये किलो)
----------
बीपीएलच्या ६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा प्राधान्य कुटुंबात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ६ लाख ५ हजार कुटुंबांतील २६ लाख ४७ हजार १४४ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
-----------
केशरीच्या साडेतीन लाख कुटुंबांना लाभ
जिल्ह्यात सध्यस्थितीला ३ लाख ३५ हजार ६६० इतके केशरी कार्डधारक आहेत. या कार्डांनुसार १४ लाख ५७ हजार ६६८ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या काळात केशरी कार्डधारकांना प्रथमच सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. त्यामुळे आता कोणीही उपाशी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ या प्रमाणे दोन किलो धान्य सवलतीच्या दराने म्हणजे गहू ८ रुपये प्रतिकिलो दराने आणि तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने दिला जाणार आहे.
-------------
डमी आहे.
फोटो- २७ रेशन दुकान