कर्जत : तालुक्यातील आंबिजळगाव ग्रामपंचायत ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही योजना राबविणार आहे. जे विद्यार्थी वृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे संगोपन करतील त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च ग्रामपंचायत करणार आहे. तसा ठराव ग्रामपंचायतच्या सभेत मंजूर करण्यात आला.ग्रामसभा सरपंच विलास निकत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२४) विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडली. यावेळी सरपंच विलास निकत या योजनेची उपस्थितांना माहिती दिली़वृक्ष लागवड व संगोपन या प्रोत्साहन देण्यासाठी आंबिजळगाव शिवारात सुमारे दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. जे ग्रामस्थ दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करतील त्यांनाही घरपट्टीत सुट मिळणार आहे. ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. पिढी व्यसनापासून दूर रहावी यासाठी आंबिजळगाव शिवारात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जत- करमाळा हा राज्य मार्ग गावातून जातो तो दुपदरी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना ठराव देण्यात येणार आहे. गावाला पिण्याचे शुद्ध पाणी, नळ पाणीपुरवठा योजना करणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.सरपंच विलास निकत हे ऐन टंचाई काळात गेल्या आठ महिन्यांपासून गावाला स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत. याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या ग्रामसभेला सरपंच विलास निकत यांच्यासह दत्ता भांडवलकर, श्रीराम गायकवाड, पोलीस पाटील बिभीषण अनारसे, किशोर निकत, अजित अनारसे, माजी सरपंच बाळासाहेब लोंढे, अनिल निकत, डॉ. राजेंद्र अनारसे, शामराव निकत, मोहन निकत, अंगणवाडी सेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.