सदस्याच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रविवारी रात्री चोरट्यांनी अमानवी कृत्य केले. शुक्रवारी निधन झालेले ग्रामपंचायत सदस्य संतोष पांडुरंग गटणे यांच्या घरी कोणीही नाही, या संधीचा फायदा घेऊन रविवारी रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला.
संतोष गटणे यांचे पुणे येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी निधन झाले. दु:खात बुडालेली त्यांची पत्नी, लहान मुले व आई पुण्यात गटणे यांच्या बहिणीकडे थांबले आहेत. त्यांचे वडील पांडुरंग गटणे घरी होते. मात्र रात्री नऊच्या सुमारास ते जेवण करून घराला कुलूप लावून शेतातील घरी झोपण्यासाठी गेले. घरी कोणीही नाही, या संधीचा फायदा घेऊन रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे गंठण, मुलींचे कानातील व पायातील दागिने असा सुमारे सत्तर ते ऐंशी हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. शेजारी राहात असलेल्या विशाल गटणे यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास चार व्यक्ती चेहरा बांधून संतोष गटणे यांच्या घराकडे जाताना दिसत आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे, हेडकॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास साहाय्यक फौजदार बजरंग गवळी करत आहेत.