अहमदनगर : विखे कुटुंबाची कामाची पध्दत जिल्ह्याला माहिती आहे. एकदा सांगितले म्हणजे काम फत्ते, अशी विखे पिता-पुत्रांची ओळख़. काम केलं नाही, तर मी तुमच्या घरी येऊन बसेन, असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबाबत खासदार डॉ़. सुजय विखे यांनी महापालिकेत बैठक घेतली़. हे काम सुरू का होत नाही? काय अडचणी आहेत? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराला चांगलेच सुनावले. ठेकेदाराला तर काम पूर्ण केले नाही तर तुमच्या घरी येऊन बसेन, अशी धमकी दिली. ठेकेदारानेही मान डोलावत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही आदेश काढला. कामाची पाहणी केली़. पण वर्षे उलटूनही गटारीचे काम ठेकेदारे पूर्ण केलीच नाही़. गुरुवारी सायंकाळी नगर शहरात अवकाळी पाऊस झाला. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी आले. या मार्गावरील दुकानांमध्ये पाणी घुसले. नगर शरातून विखे यांना सर्वाधिक मते मिळाली़. त्यामुळे विखे यांनी नगर शहरावर लक्ष केंद्रीत केले. बैठकांचा धडाका लावला़ उडाणपुलासह शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. विळदघाटात शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांबाबत नाशिक येथील अधिका-यांना बोलावून समन्वय बैठक घेतली़. या बैठकीत सर्व अडचणी दूर झाल्याने अधिकारीही कामाला लागले. पण, पुढे या कामांचे काय झाले? याचा जाब यंत्रणेला कुणी विचारलेला दिसत नाही़. त्यामुळे बैठका होऊनही दिल्लीगेटचे काम जैसे थै आहे. खासदार विखे यांनी लक्ष घालूनही हे काम पूर्ण न झाल्याने हा शहरातील सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
दादा.. तुम्ही सांगूनही काम अधुरेच; पहिल्याच पावसात दुकानांमध्ये घुसले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 1:19 PM