अहमदनगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. रमेश सावंत यांना स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. १४ ऑगस्ट २०१८ रोजी नवी दिल्ली येथील भारतीय आर्युमान अनुसंधान परिषदेने या अनुदानास मंजुरी दिली होती. महाविद्यालयात स्नताच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये उपप्राचार्य डॉ.रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली होती. या प्रकल्पात सध्या पाच सदस्य आहेत. त्यामध्ये डॉ. रमेश सावंत (मुख्य संशोधक), ज्योती वाडेकर (सहसंशोधक), ऋषिकेश उकिर्डे (वरिष्ठ संशोधन अधिछात्र), गणेश बरकडे ( प्रयोगशाळा तंत्रज्ञ), संतोष वावरे (अटेंडन्ट) म्हणून काम पाहत आहेत. या प्रकल्पाचे अंतर्गत प्रथम वर्षात २९ लाख ६५ हजार, दुसऱ्या वर्षात ८ लाख ८४ हजार, तिसऱ्या वर्षात ९ लाख ३ हजार रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. असे एकूण ४७ लाख ५२ हजार एवढे अनुदान प्राप्त झालेले आहे. या प्रकल्पाच्या संशोधनावरील चाचण्या टाटा मेमोरिअल कॉन्सर रिसर्च सेंटर (मुंबई), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे) तसेच महाविद्यालयातील संशोधन केंद्रात चाचण्या घेण्यात आल्या. प्राप्त अनुदानातून सदर संशोधनासाठी आवश्यक असणारे आधुनिक उपकरणे, रसायने व इतर साहित्य महाविद्यालयामध्ये खरेदी करण्यात आले आहे. सदर संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. रमेश सावंत यांना नुकताच मुंबई येथे पार पडलेल्या कर्करोग परिषदेमध्ये रेनेटो डब्ल्युको मेमोरिअल आवार्ड हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे. सावंत यांच्या नावावर ३ पेटंट व ८६ शोध निबंधाची नोंद आहे. तसेच ते पाच आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आहेत. गत दोन वर्षात बेंगलोर, हैदराबाद, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत संशोधन झालेले आहे. सदरचे शोध निबंध हे आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकात प्रकाशित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे, सेक्रेटरी लेफ्टनंट जनरल बी. सदानंदा, संस्थेचे संचालक डॉ. पी. एम. गायकवाड, मेडिकल कॉलेज व उपसंचालक डॉ. अभिजित दिवटे, प्राचार्य डॉ. पी. वाय. पवार यांनी कौतुक केले आहे. (वा. प्र. )
विखे फार्मसीचे सावंत यांना स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:14 AM