राहुरी : दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.
राहुरी तालुक्यातील संक्रापूर गावातील शेतकरी राधाजी चव्हाण यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आणि सोसायटीचे कर्ज घेऊन चार वर्षापूर्वी द्राक्षाची लागवड केली. १० वर्षाची गॅरंटी असलेली तार द्राक्षवेली मंडपासाठी आणली, मात्र शुक्रवारी द्राक्षांसह वेल मंडप जमिनीवर कोसळला.
व्यापा-यांनी ३५ रुपये किलो दराने जागेवरून द्राक्ष खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. मंडप कोसळल्याने चव्हाण कुटुंबीयांवर आर्थिक डोंगर कोसळला.३५ रुपये किलो जागेवर भाव मिळाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय आनंदी होते. द्राक्ष तोडणीनंतर सुमारे तीस लाख रुपये मिळणार होते. वारे अथवा वादळ नसतानाही बाग कोसळल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कृषी सहाय्यक शिवाजी पवार, ग्रामसेवक के. के. गायकवाड, पोलीस पाटील विजय गोसावी यांनी बागेची पाहणी केली. बागेचा पंचनामा करण्यात आला.
“द्राक्ष तारेची दहा वर्षाची गॅरंटी असताना अचानक मंडप कोसळला. अनुभव असल्याने उत्कृष्ट मंडप तयार झाला होता. व्यापाऱ्याची सौदा झाल्यानंतर उद्या द्राक्ष फोडणीला सुरुवात होणार होती. व्यापारी द्राक्ष रशियाला पाठवणार होता. अचानक आलेल्या आपत्तीमुळे अडीच एकर द्राक्ष बागेचे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्या”चे चव्हाण यांनी सांगितले.