- अनिल लगड (अहमदनगर)
राज्यातील शेतीची हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल होत आहे. यामुळे दिवसेंदिवस शेती उपयोगी नवनवीन अवजारे समोर येत आहेत. शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, असे बैलांच्या साहाय्याने चालविले जाणारे बहुपीक टोकण यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने विकसित केले आहे. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी हरभरा, तूर या पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
मजूरांअभावी शेतीची नांगरणी, कोळपणी पेरणी आदी विविध कामे खोळंबून अडचणी निर्माण होतात. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने संशोधन करून शेतकऱ्यांसाठी बैलचलित बहुपीक टोकण यंत्र बनविले आहे. या विभागातील प्राध्यापक व संशोधक प्रा. टी. बी. बास्टेवाड, प्रा. एम. एम. पाचारणे, प्रा. व्ही. डी. देशमुख यांनी यासाठी संशोधन केले.
या यंत्राला ज्योती हे नाव देण्यात आले असून, याद्वारे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पादनात वाढ होण्यासाठी हे यंत्र फायदेशीर ठरत आहेत. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी, हरभरा, तूर या पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते. दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर आणि बियाणांच्या बाजूला देता येते. बियाणांच्या पेट्या स्वतंत्र असल्यामुळे आंतरपिकांची टोकणसुद्धा करता येते. या यंत्राद्वारे दोन ओळीतील अंतर तंतोतंत ठेवून अगदी अचूक टोकन पद्धतीने पेरणी केली जात आहे. एका दिवसात सुमारे दीड हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करता येते.