- अनिल लगड (अहमदनगर)
उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजी झाडांना मोठ्या प्रमाणात बिया येतात. या बियांचा औषधांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याला देशभरातून चांगली मागणी असते. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात हिरडा, रिठा, करंजीच्या बिया गोळा करण्याचे काम सुरू होते. यातून चांगला रोजगारदेखील मिळतो. या बियाणांचे कवच मोठे दणकट असल्याने ते फोडणे मोठे जिकिरीचे काम असते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे कवच फोडण्याचे यंत्र बनविले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कवच फोडणे कठिण असल्याने अनेक जण ते फोडण्याच्या भानगडित न पडता, थेट व्यापाऱ्यांना विक्री करतात. त्यामुळे मजुरांना, महिलांना केवळ रोजंदारीवरच समाधान मानावे लागते. परंतु आता असे टणक बियाणे फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बाजारात उपलब्ध झाले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही एक यंत्र विकसित केले आहे. हिरडा, रिठा कवच फोडण्यासाठी एक अश्वशक्ती सिंगल फेजवर हे यंत्र चालते. याला विद्यापीठाने विद्युत मोटारचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र असे नाव दिले आहे. हे यंत्र सध्या अतिशय उपयुक्त ठरत आहे.
या यंत्राचे वैशिष्ट्य असे आहे की, एक अश्वशक्ती सिंगल फेजवर चालते. याला कमी वीज लागते. तसेच कमी श्रमात हे काम करणे सहज होते. या यंत्राची कार्यक्षमता १२५ ते १५० किलोग्रॅम प्रतितास आहे. यामुळे कामही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हे यंत्र चांगलेच फायदेशीर ठरत आहे. या यंत्राची पाहणी करण्याकरिता तसेच माहिती घेण्याकरिता अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, येथे अनेक जण भेटी देत आहेत.