अहमदनगर : ग्रामविकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच बराच निधी सरकार देत आहे. नगर शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. त्यातून ते पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्रीहसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी नगर शहरात जिल्ह्यातील २१ गावांचा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गावांचा विकास झाला, तर लोकांना शहराकडे येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायतींना मोठा निधी दिलेला आहे. त्यातून गावची शाळा, अंगणवाडी, तसेच स्मशानभूमीची कामे प्राधान्याने करा.
नगर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली तेव्हापासूनच ठरवले आहे की हे शहर देशात नंबर एकचे करायचे आहे. नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचा उपयोग करून हे शहर पर्यटनदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकसित करता येऊ शकते. त्यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुन्हा आम्हीच येणार...
पुन्हा येईन... पुन्हा येईन.. म्हणणा-यांची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण पुन्हा महाविकास आघाडीच येणार आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.