शेवगाव : शेवगाव तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, वाढते भारनियमन आदी मुलभूत समस्यांची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव दीर्घकाळ रेंगाळल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणार्या गावांना पाणी टंचाईची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच अनेक गावांतून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली. वीज बिलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ ने व पाणीपट्टीची थकबाकी वाढल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने प्रादेशिक नळ योजना पुढे चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने एकूणच तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. तालुक्यातील तहानलेल्या आखेगाव, आंतरवाली, आव्हाणे, लखमापुरी, लाडजळगाव, सोनविहीर, जोहरापूर, थाटे, दिवटे, अधोडी, खडके, मडके, खामपिंप्री, सालवडगाव, अमरापूर, ढोरजळगाव ने व भातकुडगाव अशी १९ गावे आणि वाड्या, वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागणीचे प्रस्ताव जवळपास महिनाभरापासून जिल्हास्तरावर रेंगाळल्याने नागरिकांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. टंचाई आढावा बैठक शेवगाव येथे आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उपस्थितीत आयोजित टंचाई निवारण आढावा बैठकीत वरील गावातील नागरिकांनी याप्रश्नी त्यांचे लक्ष वेधून तातडीने टँकर सुरू करण्याची तसेच टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयास द्यावे, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी) हातपंपाचे पाणी आटले तालुक्यातील ५२० हातपंपांपैकी सुमारे दीडशे हातपंप पूर्ण क्षमतेने सुरू असून, उर्वरित हातपंप पाणी पातळी खालावल्याने त्यावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणी पुरवठा अडचणीत आहे.
शेवगावसह तालुका पाणी टंचाईने जेरीस
By admin | Published: May 21, 2014 12:16 AM