अहमदनगर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाइन विक्री केली. त्यातून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. बाजार समित्यांसह भाजीपाला फळे विक्रीलाही बंदी आहे. नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, पिंपळगाव उजैनी आदी गावातील शेतकरी भाजीपाला व फळांचे उत्पन्न घेतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने भाजीपाला विकता येत नाही. अशा कठीण परिस्थितीत पिंपळगाव उजैन येथील बी फार्मर या सेंद्रिय शेतकरी गटाने विक्री व्यवस्थापनाचे धडे घेत सोशल मीडियावरून शहरासह उपनगरातील नागरिकांकडून भाजीपाला फळे, कडधान्य आदींची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार किट तयार करून ते त्यांना पोहोच करण्याचे काम सुरू केले. मागणी वाढत गेल्याने या गटाने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व त्याच्या किट बनविल्या. एका किटमध्ये साधारण आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला दिला. जानेवारीपासून ऑनलाइन विक्री करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ही विक्री सुरू असून, यातून सुमारे सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. असे या गटाचे सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.
.......
दर मंगळवारी घरपोहोच भाजीपाला
सोमवार ते शनिवारपर्यंत सोशल मीडियावर ग्राहकांकडून आर्डर घेण्यात आल्या. आठवडाभरात आलेल्या ऑर्डरची एकत्रित यादी तयार करून ग्राहकाच्या नावाने किट बनविण्यात आल्या. रविवारी ही यादी सोशल मीडीयावर शेतकऱ्यांना पाठविण्यात आली. यादीनुसार शेतकऱ्यांनी आपल्याकडील पालेभाज्या, कलिंगड, खरबूज, चिक्कू शेतकरी गटाकडे जमा केला. एकत्रित जमा झालेल्या भाजीपाला व फळांच्या किट तयार करून त्या ग्राहकांना थेट घरी पोहोच केल्या गेल्या. त्यात काही संस्थांनी मागणी नोंदविली. त्यामुळे मागणी वाढवून शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला गेला.
.....
- परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कलिंगड, खरबूज खराब होऊ लागले. कमी भावात विक्री करावी लागत होती. त्यात सममित्राचे गणेश सानप यांची भेट झाली. त्यांनी विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली. सोशल मीडियावरील अनेक ग्रुप जॉईन झाले. यातूनच मागणी वाढवून चांगले उत्पन्न मिळाले.
- ज्ञानेश्वर वाघ, सचिव, बी फार्मर शेतकरी गट, पिंपळगाव उजैनी
....
सूचना: फोटो आहेत.