अहमदनगर : गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.
शिंदे म्हणाले जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. गावठी कट्यातून खूनाच्या घटना घडतात ही दुर्दैवी बाब आहे. अवैधरित्या जवळ हत्यार बाळगणा-यांवर आता कडक कारवाई होणार आहे. संघटित गुन्हेगारी करणा-यांवरही मोक्का, एमपीडीतंर्गत कारवाई केली जाईल. अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनीही पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाईल. जिल्ह्यात ज्या पोलीस निरिक्षिकाच्या हद्दीत अवैध हत्यात तस्करी आढळून येईल त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटना दुर्दैवी आहेत. जामखेड हत्याकांडातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा १५ पथकांच्या माध्यमातून शोध सुरू आहे तसेच या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी विशेष चार टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. या घटनेतील सर्व आरोपी लवकरच जेरबंद होऊन त्यांना कठोर शासन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.