जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो. त्यावेळी झालेल्या गोंधळास आम्ही जसे जबाबदार आहोत त्याचप्रमाणे आयोजक पालकमंत्री राम शिंदे जबाबदार आहेत, त्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केली आहे. यासाठी भिसे यांच्यासह १६ कार्यकर्त्यांनी जेलमध्ये गुरुवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.न्यायालयीन कोठडीत डॉ. भिसे यांनी उपोषण सुरू केले आहे. सबजेलर राजेंद्र माने यांनी या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नाही. तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांन माहीती कळवली आहे. डॉ. भिसे यांच्या वतीने तहसीलदार यांच्याशी विशाल नाईकवाडी यांच्याशी अॅड. बाजीराव गावडे, सुरेश भाऊ कांबळे, पांडुरंग मेरघळ, बाळासाहेब कोळेकर, डॉ. शिवाजी देवकाते, विलास देवकाते आदी चर्चा करीत आहेत.
पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा : डॉ. इंद्रकुमार भिसेसह कार्यकर्त्यांचे जेलमध्ये उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:12 PM