अहमदनगर: महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे येत असताना विद्यार्थ्यांना पाहताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून विद्यार्थ्यांचा प्रश्न समजून घेत देहरे येथे नियमित बस थांबविण्याच्या सूचना केल्या. तसेच विद्यार्थ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांच्या सूचना केल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगर- मनमाड रोडने अहमदनगर येत होते. त्यावेळी रस्त्यात देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता. विद्यार्थ्यांना पाहताच विखे पाटील यांनी ताफा थांबविण्याच्या सूचना केल्या. वाहनातून उतरतून त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. देहरे गावातून नगरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, नगरकडे जाणारी एकही बस देहरे गावात थांबत नाही. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी यावेळी पालमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली. त्यावर विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेळाव्यात येण्यास सांगितले. विद्यार्थी मेळाव्यात हजर झाले. यावेळी विखे पाटील यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नगरकडे जाणाऱ्या सात बस उद्यापासून देहरे गावात थांबविण्याचा निर्णय झला. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.