श्रीरामपूर : येथील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांचे चिरंजीव यश गुलाटी व वारविक युनिव्हर्सिटी (इंग्लंड) येथील विद्यार्थिनी देविका घोषाल यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणाऱ्या स्टार्टअपची स्थापना केली आहे.
भारतातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बुध्दिमत्ता व गुण असूनही चुकीच्या सल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये अनेकांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ही अडचण ओळखून स्टार्ट अप सुरू केल्याचे गुलाटी यांनी सांगितले. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह २५ देशांतील ३५ हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी हे या स्टार्टअपचे सदस्य आहेत.
परदेशातील शैक्षणिक सल्लागार व एजंटकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होण्याचा धोका असतो. अशा वेळी शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असते. अशा विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश व शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी काम करणार आहे, असे गुलाटी यांनी सांगितले. जगातील पहिल्या सर्वोत्तम १०० विद्यापीठात भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या इनफॉरन्सकडून अचूक सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------