गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्रात काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम; अशोक चव्हाण यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:44 PM2017-12-20T18:44:52+5:302017-12-20T18:45:42+5:30
महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण असून गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केला.
शिर्डी : महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण असून गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केला. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ यापुढेही महाराष्ट्रात काँगे्रसच एक नंबरवर राहिल, असा दावा त्यांनी केला.
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या चव्हाण यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे शांतीनाथ आहेर, अशोक खांबेकर, भाऊसाहेब कडू आदींची उपस्थिती होती.
गुजरात निवडणुकीत अमित शहांनी दिडशे जागा मिळण्याचा दावा केला होता. पण जनतेने २८ टक्के जीएसटी वजा करून त्यांना मतदान केल्याची उपरोधिक टोलाही चव्हाण यांनी लगावला. गेल्या सहा निवडणुकांच्या तुलनेत यंदा प्रथमच गुजरातमध्ये पक्षाची चांगली कामगिरी झाली आहे. राहुल गांधीच्या झंझावातामुळे व मेहनतीमुळेच हे घडले. तसेच काँग्रेसचे असंख्य नेते त्यांच्यामुळे जोमाने कामाला लागले. त्यामुळेच मतात व निवडून येणा-या जागेत वाढ झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपला जिल्हा सांभाळावा व मग राज्यात लक्ष द्यावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला. आपण आपल्या जिल्ह्यात काय करतो, पक्ष संघटना कशी आहे, कार्यकर्ते काम करतात का, निकाल चांगले लागतात का याच मुल्यमापन झालं पाहिजे, असेही ते म्हणाले.