अहमदनगर : सध्या वने आणि वन्यप्राण्यांचे वैभव नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये पाहावयास मिळत आहे. डोगंरद-यात वसलेले यंदा पावसामुळे सुजलाम सुफलाम झाले आहे. डोंगरमाथ्याचा प्रदेशामुळे वनराई फुलली असून पर्यटकांना गाव साद घालत आहे.
अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले नगर तालुक्यातील गुंडेगाव निसर्गरम्य वातावरणाने बहरून गेले आहे. गावाला ८५० हेक्टरचे वनक्षेत्र लाभले आहे. यामधील ५५० हेक्टरवर वन समितीमार्फत वृक्ष लागवड करण्यात आली. आज या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डोंगरमाथ्याचा प्रदेश असल्याने ५५० हेक्टर क्षेत्रात सीसीटी करण्यात आली. तर ३०० हेक्टर क्षेत्रात डीप सीसीटी बांधण्यात आले. वनक्षेत्रात ११ मातीचे बंधारे तर २ वनतलाव बांधले. यामुळे डोंगरावरून वाहून जाणारे पाणी डोंगरातच जिरू लागले. गावच्या वनक्षेत्रात सामाजिक वनीकरणमार्फत ३४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. १६ किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आणि शेताच्या बांधांवरही वृक्ष लागवड करण्यात आली. सध्या ही झाडे मोठी झाल्याने गावच्या सौंदर्यात भर पडली आहे.
निसर्गरम्य वातावरणात मोर, हरीण, वनगाय, तरस, ससे, घोरपड, लांडगे यासह अनेक प्राण्यांचा वावर वाढला आहे. विविध रंगी पक्षी स्वच्छंदपणे पाहावयास मिळत आहेत. निसर्गत: प्राणी आणि पक्षी हे ही स्वच्छंद गुंडेगावच्या परिसरात बागडताना दिसत आहेत. स्वच्छ निरभ्र निळे आकाश अल्हादायक वातावरण बघून मन प्रसन्न होत आहे.
मनुष्य स्वत:ला निसर्गापेक्षा मोठा समजायला लागला. आज कोरोना विषाणूने मानवजातीला जागा दाखवून दिली आहे. मानवाने पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज आहे. गुंडेगावच्या नागरिकांनी पर्यावरण जोपासण्यासाठी महत्वाचे काम केले. त्यामुळेच गावातील पाणी गावातच राहू लागले. वृक्षलागवडीमुळे गाव सुजलाम, सुफलाम झाले. पृथ्वीवर वन्य पशू असो वा झाडे झुडपे या सर्वांना समान हक्क आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, वन्यजीव व निसर्ग यांचा सन्मान करा!
- दादासाहेब आगळे, पर्यावरणप्रेमी.