केडगाव : पाणलोटच्या विविध कामांमुळे गुंडेगाव (ता. नगर) पाणीदार गाव होणार आहे. येथे कृषी विभागांतर्गत गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आला. यातून जवळपास दीड कोटी रूपयांची कामे होणार आहेत.
याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी टकले, पर्यवेक्षक नारायण करांडे उपस्थित होते.
गुंडेगाव परिसरातील कोळगाव रोड, धावडे वाडी, हराळ मळा, माने मळा, नगर रोड याठिकाणी शेताची बांध बंदिस्त करणे, माती नाला बांध दुरुस्त करणे, डीपसीसीटी खोदकाम करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. गावामध्ये मागील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत राहिलेल्या कामांचे संपूर्ण नियोजन करून संबंधित कामाचे आराखडे दोन वर्षांपूर्वीपासून बनविण्यात येत होते. त्यानुसार कृषी विभागामार्फत गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम योजनेंतर्गत संबंधित कामांचा समावेश करून मंजुरी घेण्यात आली. पाणलोट क्षेत्र अंतर्गत अजूनही राहिलेल्या कामांचे नियोजन करून ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा मानस बाळासाहेब हराळ यांनी व्यक्त केला.
गावचा संपूर्ण पाणलोट विकास करून गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत हराळ यांनी व्यक्त केले. संबंधित भागातील शेतकऱ्यांनी स्वतः उभे राहून उत्कृष्ट प्रकारचे काम करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी गुंडेगावच्या सरपंच मंगल संकट, उपसरपंच संतोष भापकर, आदर्श सरपंच संजय कोतकर, सुनील भापकर, सेवा संस्था अध्यक्ष वामनराव जाधव, बबनराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, नानासाहेब हराळ, संतोष धावडे, भाऊसाहेब हराळ, पोपटराव हराळ, किरण कोतकर, राजेंद्र मोहिते, दिलीप धावडे, लाला भाई शेख आदी उपस्थित होते.