अहमदनगर : वंशाचा दिवा असावा, यासाठी आपल्याकडे मुलं दत्तक घेतले जाते. गुरुजींनी मात्र सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविण्याठी आपल्याच भावा- बहिणींना दत्तक घेतल्याचा प्रकार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत समोर आला आहे. बदलीसाठी अपंगांचे पालकत्व सध्या जिल्हा परिषदेतील चर्चेचा विषय ठरला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बदलीस अपात्र शिक्षकांच्या सुनावणीला सुरुवात झाली. शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील २३४ शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने विविध कारणांमुळे अपात्र ठरविल्या आहेत. बदलीस अपात्र जिल्ह्यातील १४७ गुरुजींनी स्वत: त्यांचे म्हणणे मांडले. सुनावणीदरम्यान अपंगांचे पालकत्व स्वीकारलेल्या पाच शिक्षकांनी संवर्ग १ मधून बदल्या मिळविल्याचा विषय चर्चेसाठी आला. अपंग मुलांचे पालकत्व आणि तेही आपल्याच बहिणीचे दत्तक विधान यावेळी गुरुजींकडून सादर करण्यात आल्याने अधिकारीही अवाक् झाले. दोघा शिक्षकांनी आपल्या अपंग भावाचा संभाळ करत आहोत, त्यामुळे आम्हाला दूरच्या शाळेवर नियुक्ती न देण्याची विनंतीही यावेळी केल्याचे समजते. अपंग बहीण-भावाला दत्तक घेऊन शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविली. बदलीप्रक्रियेत संवर्ग १ मध्ये गतिमंद, मंतिमंद, विकलांग मुलांचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांना सवलत मिळते. या सवलतीचा जिल्ह्यातील पाच शिक्षकांनी लाभ घेतला. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दत्तक विधान म्हणजे काय, ते कसे करावे लागते, कोणाकडून करावेत, ते ग्राह्य कसे धरायचे, यासह अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेतील काही अधिकारी कामाला लागले आहेत. अपंग मुलांचे पालकत्व स्वीकारणा-यांना बदलीत सवलत द्यावी किंवा नाही, याबाबतचा ठोस निर्णय घेण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. पती-पत्नी एकत्रिकरण या सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी काहींनी रस्त्यात ओढा असल्याने लांबून जावे लागत असल्याचे कारण दिले आहे. गुगल मॅपचे अंतर आणि प्रत्यक्षात दिलेले अंतर यात तफावत आढळून आल्याने दुचाकीवरून अंतर मोजण्यात आले. मात्र ते शिक्षकांना मान्य नाही़ त्या रस्त्याने बसच जात नाही, असे कारणही काहींनी दिले आहे.विस्थापित आक्रमककागदपत्रांच्या तपासणीतील गोंधळ आणि विस्थापितांना अपात्र शिक्षकांच्या जागी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी विस्थापित पुन्हा आक्रमक झाले आहेत. विस्थापितांच्या वतीने जिल्हा परिषदेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बदलीसाठी गुरुजींकडून अपंग बहीण-भाऊ दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:17 PM