नेवासा : अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गुरुवारी नेवासा येथे करण्यात आला. अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी काढले.
नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात सोमवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक,माजी आमदार संभाजीराव फाटके उपस्थित होते.
प्रारंभी प्रभू श्री रामचंद्र, भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संकलन निधी पुस्तकाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दर्शन गणेश परदेशी व पाच वर्षीय सुयोग योगेश काळे या बालकांनी साठवलेले खाऊचे पैसे निधीच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी बाबांकडे सुपूर्त करण्यात आले. तर माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या सर्व परिवाराच्या वतीने २ लाख ५५ हजारांचा निधी यावेळी धनादेशाच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, निधी संकलनाच्या निमित्ताने रामकार्य होण्यासाठी सर्वजण एकत्रित आलेले दिसत आहेत. सर्व जातीधर्माच्या बांधवांचा यात समावेश आहे. त्यामुळे सर्वांचेच हे कार्य आहे. निधी संकलन करत असतांना पक्ष, जात, भेद, धर्म याचा विचार करु नका. स्वयंसेवक रामभक्त हा गल्लीबोळात दारादारात येणार आहे. त्यांना या कार्यासाठी प्रत्येकी दहा रुपये देऊन या कार्यात सर्वांना खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.