श्रीरामपूर : प्रतिबंधित गुटखा व पानमसाला पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभी राहणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांबरोबर महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पानमसाला यांच्या सेवनाच्या आहारी गेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने केलेल्या पाहणीत तसे आढळून आले आहे. प्रशासनाने जिल्ह्यात या पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्याचबरोबर प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे गोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तरुण पिढीली दुर्धर आजारापासून वाचविण्यासाठी व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन प्रतिबंधित पदार्थांची विक्री थांबवावी. त्यामुळे लाखो लोकांच्या जीविताचा धोका कमी होणार आहे. नागरिकांनीही अधिक सतर्क होत गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची माहिती द्यावी. शक्य झाल्यास तेथील छायाचित्रे प्रशासनाला द्यावी. नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आयुक्त गोरे यांनी म्हटले आहे.
बेकायदेशीररीत्या पदार्थांची विक्री आढळून आल्यास सात वर्षे शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
--------