नेवासा : महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे रविवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम व दिगंबरा ..दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजराने देवगड नगरी दुमदुमली होती. परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडी आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची मूतीर्चे व समाधीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वेदमंत्राच्या जयघोषात पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पालखीतील किसनगिरी बाबांच्या प्राकृत पादुकांचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीमध्ये सुमारे दीडहजार महिला व पुरुष भाविकांचा समावेश आहे. प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखी मध्ये ठेवण्यात अलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी सभापती सुनीता गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्यार्चे अग्रभागी अश्व, झांज पथक, बँण्डपथक, ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्यावर तुलसी कलश घेत नामस्मरण करणा-या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते.
ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषानं देवगड नगरी दुमदुमली, दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:15 PM