टीव्ही पाहता-पाहता जेवण करण्याची सवय लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध नागरिकांमध्ये देखील जडली आहे. रात्रीचे जेवण करताना कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे टीव्ही पहायला बसतात. एकत्र जेवण होते. पण त्यावेळी एकमेकांशी संवाद कमी होतो. अथवा तो होतच नाही. टीव्ही पाहण्यात मग्न होऊन आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण जाते. जेवणानंतरही एकाच जागी टीव्ही पहायला बसत असल्याने याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहेत.
प्रत्येक घास नीट चावून खाल्ला असता शरीरात पाचक रस तयार होतो. मात्र, घाईघाईत जेवणाकडे लक्ष न दिल्यास अन्न नीट पचत नाही. त्यामुळे पित्त, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोट बिघडणे असे त्रास होतात. लहान मुले टीव्ही पाहिल्याशिवाय काहीच खात नाहीत. कोरोनामुळे मुले घरीच असल्याने ते दिवसभर टीव्ही पाहत असतात. त्यांना रागावले, ओरडले असता ते रडतात. टीव्ही पाहिल्याशिवाय, मोबाईल हातात दिल्याशिवाय ते दूध घेत नाहीत, जेवत नाही. त्यामुळे आमच्यासमोर त्यांचा हट्ट पुरविण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. शाळा बंद असल्याने मुलांमध्ये मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. लाईट बंद करून मुले दिवसभर टीव्ही पाहत असल्याने टीव्हीसमोरून त्यांची नजरच हटत नाहीत. असेही काही महिलांनी सांगितले.
----------------
अधिक वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांचा पडदा खराब होऊ शकतो. मोबाईल अथवा टीव्हीतून निघणारा प्रकाश डोळ्यांना त्रासदायक ठरून डोळ्यांची बाहुली बारीक होऊ शकते. चष्मा लागू शकतो. गेलेली नजर पुन्हा कधी येत नाही. ॲम्लोपियाचे रुग्ण वाढत असून हा आजार लहान मुलांमध्येच बळावतो आहे. यात एक डोळा आळशी बनतो. दुसऱ्या डोळ्याने चांगले दिसत असल्याने हा आजार लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते.
डॉ. स्मिता गायकवाड, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर
---------------
कोणतेही अन्न योग्य पद्धतीने चावून खाल्ले तरच ते पचते. टीव्ही पाहताना अनेकदा जेवणाची घाई होते. त्यामुळे जेवण कधी कमी तर कधी अधिक प्रमाणात होते. याचा परिणाम पोटावर होतो. त्यामुळे पित्त, बद्धकोष्ठता यांचा त्रास होऊन भविष्यात तो वाढू शकतो. पोटात गॅसचे प्रमाण वाढून जळजळ, मळमळीचा त्रास होतो. पुढे हाच त्रास हृदयविकारात बदलू शकतो.
डॉ. प्रदीप कुटे, पोटविकार तज्ज्ञ, संगमनेर
--------------
टीव्हीपुढे बसून किंवा मोबाईल हाताळत जेवण केल्यास लहान मुलांमध्ये अति लठ्ठपणा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना काळात मुलांचे टीव्ही पाहण्याचे मोबाईल, संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो.
डॉ. जयश्री जाधव, बालरोग तज्ज्ञ, संगमनेर
-------------------
टीव्ही, मोबाईल पाहिल्याशिवाय मुले दूध देखील घेत नाहीत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत. त्यामुळे त्यांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. टीव्ही जे पाहता त्यानुसार मुले अनुकरण करायला बघतात. टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढल्याने मुलांमध्ये मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे.
चेतना मुथा, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर
------------
पोटविकाराची प्रमुख कारणे
अनेक जण सकाळी लवकर कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात. सकाळी काही तरी घाईघाईत खातात. दुपारी कार्यालयात जेवण केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करतात. रात्री उशिरा घरी पोहोचून जेवण केल्यानंतर लगेच झोपतात. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याने पोटविकाराबरोबरच इतरही आजार जडतात.
------------
पोटविकार टाळायचे असतील तर
पोटविकार टाळायचे असतील तर जेवण करताना संपूर्ण लक्ष हे जेवणाकडे असायला हवे. टीव्ही पाहत, मोबाईल हातात घेत, संगणकासमोर बसून जेवण करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. जेवणानंतर लगेचच झोपू नये. जेवण झाल्यानंतर एकाच ठिकाणी बसू नये. थोडे फिरावे. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होते. पोटविकारमुळेच इतर आजार होऊ शकतात.