विसापूर : अर्धा पावसाळा होऊनही श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयात मात्र अद्यापही ठणठणाट आहे. कुकडी कालवा एक महिना वाहन असतानाही विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्यात आले नाही.
मागील वर्षी २० सप्टेंबरला विसापूर जलाशय ओव्हरफ्लो झाला होता. मात्र यावर्षी केवळ दहा टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी कुकडीचे ओव्हरफ्लोच्या पाण्याने विसापूर ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के भरले होते. यावर्षी या काळात विसापुरात पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात कुकडीचे ‘ओव्हरफ्लो’चे पाणी जवळपास एक महिना चालू होते. परंतु, या काळात ना श्रीगोंदा तालुक्यात मिळाले, ना विसापूर प्रकल्पाला. कुकडी कालवा बंद होताना विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी शेवटी दोन दिवस अल्प प्रमाणात पाणी सोडले गेले. त्यामधून केवळ तीस ते चाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला.
विसापूरचा प्रकल्प ज्या हंगा नदीवर आहे. त्या हंगा नदीला अद्याप थेंबभरही पाणी आले नाही. कारण हंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पारनेर तालुक्यातील हंगा व सुपा परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नाही. मागील वर्षी या काळात विसापूर ओव्हरफ्लो होऊन हंगा नदी दुथडी भरून वाहत होती. आता मात्र ९१८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या विसापूर प्रकल्पालामध्ये ८५ घनफूट म्हणजे जवळपास दहा टक्के पाणीसाठा आहे.
अशात विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी पाटबंधारे विभाग कशी पूर्ण करणार हे एक न उलगडणारे कोडे आहे. तालुक्यातील नेत्यांनी विसापूरमध्ये पाणी सुटावे यासाठी पाठपुरावा करून ही कुकडीच्या अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे आता पावसाने हुलकावणी दिल्याने विसापूर लाभक्षेत्रातील खरातवाडी, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, बाबुर्डी, चिंभळा, शिरसगाव बोडखा या गावांबरोबरच विसापूर प्रकल्पाचे परिसरातील लिफ्टधारक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.