शेवगाव : तालुक्यातील वडुले गावाचा गत दोन महिन्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा, वारंवार सांगून, निवेदन देऊन सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगावच्या वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अर्धनग्न आंदाेलन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांना निवेदन देण्यात आले.
वेळोवेळी मागणी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संत गाडगेबाबा चौकातील वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मंगळवारी दुपारी अर्धनग्न आंदाेलन केले.
यावेळी वडुलेचे संजय पांडव, भाऊसाहेब जाधव, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर कराड, अक्षय कराड, राम कराड, प्रताप परदेशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भाऊ बैरागी, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, दीपक कुसळकर आदी उपस्थित होते.
वडुले बुद्रूकसह परिसरातील नागरिकांचे रात्री वीज नसल्याने प्रचंड हाल होत आहेत. दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. असे सांगताना स्वाभिमानीचे प्रशांत भराट यांनी अर्धनग्न होऊन निषेध नोंदवला आहे. आगामी दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले, जाईल असा इशारा दिला आहे.
---
१७ शेवगाव आंदोलन
शेवगाव येथे अर्धनग्न आंदोलन करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.