लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अजूनही पळापळ सुरूच आहे. रेमडेसिविरचे उत्पादन आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या या प्रमाणात जिल्ह्यात अजूनही अडीच टक्क्यांप्रमाणेच रेमडेसिविरचा कोटा उपलब्ध होत आहे. त्यामुळे चार हजारांपेक्षा जास्त रेमडेसिविरची गरज असताना केवळ दीड हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. त्यामुळे अजूनही खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना रेमडेसिविर प्रिस्क्रिप्शन देत असून इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ सुरूच आहे, तर दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजारही होत असल्याचे दिसते आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१ ते २२ हजार इतकी आहे. यापूर्वी जिल्ह्यात १३ हजार सक्रिय रुग्ण असल्याची संख्या ग्राह्य धरून रेमडेसिविरचे एकूण उत्पादन आणि रुग्णांची संख्या याप्रमाणे २.३२ टक्के इतका कोटा नगर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्यासाठी मिळणे आवश्यक आहेत. मात्र, या निश्चित केलेल्या कोट्यापेक्षाही पाचशे ते सातशे इंजेक्शन कमी मिळत आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २१ ते २२ हजार इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी मिळणारा कोटा हा ४ टक्के असावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य खात्याकडे केली आहे. तसेच पालकमंत्री, महसूलमंत्री यांनीही रेमडेसिविरचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, त्याचा कोणताही परिणाम अद्याप तरी दिसत नाही. राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीही पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्याशी चर्चा करूनही रेमडेसिविरचा कोटा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची पुन्हा एकदा इंजेक्शनसाठी पळापळ सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा मर्यादित येणारा साठा वितरित करण्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, कोटाच नसेल तर सर्व सूचना निरर्थक असल्याचे दिसते आहे.
दरम्यान, महसूल विभागातील रुग्णांची संख्या, उपलब्ध झालेले इंजेक्शन यानुसार कोणत्या रुग्णालयाला किती रेमडेसिविर द्यायचे, याचा कोटा निश्चित करण्याचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या कोट्याप्रमाणेच संबंधित हॉस्पिटलला इंजेक्शन मिळणार आहेत.
-------
डॉक्टर ठरविणार कोणाला द्यायचे?
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने प्राप्त झालेले रेमडेसिविर संबंधित रुग्णालयांना पाठविण्यात येतात. त्या रुग्णालयांतील डॉक्टरांनी ते कोणत्या रुग्णाला रेमडेसिविर आवश्यक आहे, त्याप्रमाणे ते द्यायचे आहे. रुग्णालयाला मिळालेल्या इंजेक्शनमधून कोणत्या रुग्णाला सर्वांत आधी गरज आहे, त्यानुसार ते इंजेक्शन द्यायचे आहेत. मात्र, आवश्यक तेवढा कोटा न मिळाल्याने डॉक्टरांकडून रुग्णांनाच रेमडेसिविर आणण्याबाबत सांगितले जात आहे. तसे अनेक खासगी डॉक्टर लिहूनही देत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी भटकंती सुरू आहे.
--------
रेमडेसिविर वाटपाची पद्धत
१) प्राप्त कोट्यातून रुग्णालयनिहाय वाटपाची यादी प्रांताधिकाऱ्यांकडून निश्चित होते.
२) रुग्णालयांनी त्यांना मंजूर झालेले इंजेक्शन औषध पुरवठादारांकडून घ्यायचे आहेत
३) रुग्णालयांनी प्राधिकारपत्र, अधिकृत व्यक्तीचे ओळखपत्र सादर करून पुरवठादाराकडून इंजेक्शन घ्यायचे आहेत.
४)घाऊक विक्रेत्यांनी शासकीय, वाजवी दरात, त्याच तारखेस इंजेक्शन वितरित करायचे आहेत.
५) रुग्णालयातील डॉक्टर सांगतील त्या रुग्णाला उपलब्ध संख्येतून इंजेक्शन द्यायचे आहे.
५)आरोग्य पथकातील अधिकाऱ्यांनी यादीप्रमाणे वाटप झाले का याची खातरजमा करायची आहे
६)भरारी पथकाने वाटपात अनियमितता आढळली तर कारवाई करायची आहे.
-------------
सोमवारी रात्रीचे वाटप
कंपनी प्राप्त वाटपासाठी उपलब्ध
हेट्रो ८४८ ४३२
सनफार्मा ८० ८०
झायडस ४८० ४८०
एकूण १५०८ ९९२
(५१६ इंजेक्शन थेट हॉस्पिटलला देण्यात आले)
---------
कोणत्या तालुक्याला किती रेमडेसिविर
नगर-६६४
पारनेर-३३
श्रीगोंदा-२७
शेवगाव-१८
अकोले-१०
राहुरी-१७
श्रीरामपूर-४१
शिर्डी-५६
राहाता-५६
जामखेड-१७
पाथर्डी-१८
कर्जत-११
नेवासा-३०
कोपरगाव-३८
------------