अहमदनगर : शहरात डेंग्यूसह साथीचे आजार वाढलेले असताना महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अशातच महापालिकेच्या दोन आरोग्याधिका-यांच्या कारभारावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका आरोग्याधिका-यांच्या दालनामध्ये दुस-या अधिका-याने चक्क गोडावून करून टाकले. त्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला असून याकडे मात्र महापालिका आयुक्तांसह अधिकारी व लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.दोन-तीन महिन्यांपूर्वी वैदुवाडी भागातील बाबाजी शिंदे यांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. याला जबाबदार धरून महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना पदावरून हटविले होते. त्यांच्याकडे घनकचरा विभागाचा कार्यभार देण्यात आला. त्यांच्या जागेवर डॉ. सतीश राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. राजूरकर यांच्याकडे पदभार येताच डॉ. बोरगे यांनी त्यांच्या आधीच्या दालनातील सर्व साहित्य इतर ठिकाणी हलविले. या प्रकरणात आयुक्तांनी दोन्ही अधिका-यांना नोटिसा बजावल्या होत्या. डॉ. बोरगे यांच्या हस्तक्षेपामुळे काम करणे अशक्य असल्याचे डॉ. राजूरकर यांनी म्हटले होते. त्यानंतर डॉ. राजूरकर रजेवर असून त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. बोरगे हेच कारभार पाहत आहेत. आरोग्य विभागासाठी खरेदी केलेले साहित्य शनिवारी महापालिकेत पोहोचले. हे साहित्य थेट वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या दालनात ठेवण्यात आले. हे दालन आता चक्क गोडावून झाले आहे. त्यामुळे डॉ. राजूरकर यांना बसण्यासाठी जागाच उरली नाही. औषधांची खोके असलेल्या दालनात बसून डॉ. राजूरकर कारभार पाहणार का? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. आरोग्य अधिकारी पदावर डॉ. सतीश राजूरकर यांची नियुक्ती असली तरी प्रत्यक्षात डॉ. बोरगे हेच काम पाहत आहेत. याबाबत आयुक्तांनीच तोंडी आदेश दिल्याची माहिती आहे. दोन अधिका-यांच्या पदावरून सुरू असलेल्या भांडणात मात्र शहराचे आरोग्य पार बिघडले असून त्यावर आयुक्त आणि लोकप्रतिनिधी कधी आवाज उठविणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आरोग्याधिका-याचे दालन बनले गोडावून; अहमदनगर महापालिकेचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 2:59 PM