अरुण वाघमोडे, अहमदनगर: महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातउपोषण केले. या उपोषणात ऑल इंडिया ब्लाईन्ड असोशिएशनचे अमित सोनार, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, दिव्यांग विकास परिषदेचे असलम पठाण, सरोजिनी गांगुर्डे, अंबादास रासकोंडा, गौरव राठोड, सुधाकर कोंडेकर, आरती जाधव, राजू मचे, बाहुबली वायकर, अशोक सोनवणे, यश व्यवहारे आदींसह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
महापालिका हद्दीतील १४४७ दिव्यांगांना ५ टक्के सेस मधून प्रती महिना उदरनिर्वाह अनुदान देण्यात येते. परंतु मागील अनेेक महिन्यांपासून दिव्यांगांना अनुदान न मिळाल्याने दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिव्यांगांचा उदरनिर्वाह व औषधोपचाराचा खर्च देखील भागत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या उपोषणाची दखल घेवून एका महिन्याच्या अनुदानाचा चेक तातडीने काढण्याचे व उर्वरीत थकित अनुदान एप्रिलमध्ये देण्याचे आश्वासन उपायुक्त (कर) बांगर यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.