शेवगाव : सध्या राज्यात कोरोना आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान कोरोना काळात आपली कर्तव्ये, अविरतपणे, विना तक्रार नगरपरिषदेतील आरोग्य विभागाचे कर्मचारी बजावत आहेत. दैनंदिन कामकाज सोबत कोरोना काळातील वाढीव जोखमीची कामे ते चोख पार पाडताना पाहिला मिळत आहेत.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या हातांना पुरेसी सुरक्षा साहित्य, मोबदला मिळताना दिसून येत नाही.
सकाळी ६ ते ९, तसेच दुपारी २ ते ६ या कामकाजाच्या वेळेत शहरातील गल्ली, बोळा, रस्त्याची झाडलोट, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, कचरा गोळा करणे, तो घंटा गाडीत संकलित करुन त्याची विल्हेवाट लावणे, शहरात कुठेही एखादे जनावर मृत आढळून आल्यास त्याची विल्हेवाट लावणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, साथ रोग काळात औषध फवारणी आदी कामे आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. या दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त आणखी दोन जोखमीची काम त्यांच्यावर खांद्यावर येऊन पडली आहेत. त्यामध्ये कोरोना केअर सेंटर मधील स्वच्छता करताना झाडलोट, गादी पुसणे तसेच कोरोना आजाराने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 'त्या' शरीरावर अंत्यसंस्कारही सदर कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत. अंत्यसंस्कार वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर पुरवण्यात येते.
मात्र दैनंदिन स्वच्छतेची कामे करताना हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर मिळत नसल्याचे वंचित बहुजन कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात यांनी सांगितले.
....
वेगळा कचरा साठवण्याची गरज
शहरात लक्षणे नसलेले अनेक जण होम आयसोलेट आहेत. त्यांच्या घरातून निघणारा कचरा स्वतंत्र न ठेवता सार्वजनिक घंटा गाडीत वेगळा टाकला जातो आहे. यात नागरिकही गाफील असून नगरपरिषदेची स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे दिसते. अशी जोखमीची कामे करताना कर्मचाऱ्यांना पुरेसे सुरक्षा साधने, साहित्य मिळणे गरजेचे आहे
----
आरोग्य विभागात सध्या २५३ कर्मचारी आहेत. नगरपरिषद स्थापन होऊनही अद्यापही ग्रामपंचायतप्रमाणे किमान वेतन मिळते आहे. ४ महिन्यापासून वेतन थकले आहेत. कोरोना काळात काम करतांना हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साहित्य मिळत नाहीत. कर्मचारी हे जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
-रमेश खरात, अध्यक्ष, वंचित बहुजन कामगार संघटना.
............
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम, जबाबदारी वाढली आहे. शहरातील कोरोना केअर सेंटर मधील स्वच्छतेची कामे आरोग्य विभागाकडून सुरु आहेत. कोरोना आजाराने निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार कर्मचारी करत आहेत. तिघा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर पुरवण्यात येते. तसेच होम आयसोलेट व्यक्तीच्या घरातील कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीत ठेवला जातो.
- भारत चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख.
..........
१४ शेवगाव१,२