लोणी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांची संख्या राहाता तालुक्यात मोठी असल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, जिल्हा व तालुका प्रशासन सामान्य जनतेची चांगली काळजी घेत कोरोनाच्या महामारीशी यशस्वीपणे झुंज देत आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मात्र, लघु व्यावसायिक व मोलमजुरी करणाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण होत आहे.
.............
संकटात पडली भर
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवत आहे. अत्यावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने ब्रेक द चेन मुळे १ जूनपर्यंत बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करून दिली आहे. अगोदरच काही उद्योग वगळता इतर कामधंदे बंद असल्याने मजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे राहाता तालुक्यातील मजुरांच्या संकटात भर पडली आहे.
...................
संसर्गाची धास्ती
राहाता तालुक्यातील लोणी, राहाता, आडगाव, खडकेवाडे, कोऱ्हाळे, वाकडी,दाढ, अस्तगाव, डोऱ्हाळे, पुणतांबा, कोल्हार, राजुरी आणि बाभळेश्वर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा काढण्याचे काम पूर्ण झाले असून सध्या हा कांदा चाळीत साठवणूक करण्याची लगबग सुरू आहे. परंतु, शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेतली असून, शेतीच्या कामासाठी मजुरांना शेतात बोलावण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे शेतकरी घरचे घरी हा कांदा चाळीमध्ये साठवण करत आहेत.
-शिवाजी रामराव शेळके, शेतकरी, आडगाव, ता. राहाता.
................
दिवस पार करायचा
कोरोनाच्या धास्तीपायी शेतात कामासाठी कोणी बोलवित नाही, अन्य व्यवसाय बंद असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे हातात दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती नाही. रेशनवर धान्य मोफत मिळाले पण ते शिजवून खाण्यासाठी इतर सामान आणायचं कुठून? त्यामुळे कसेतरी कच्चे,मच्चे शिजवून आलेला दिवस कसा तरी पार करायचा.
-शहाबाई माळी, मोलमजुरी करणारी महिला, लोणी,ता. राहाता .
फोटो- लोणी
220521\img_20210522_120454.jpg
शेती कामांच्या शोधार्थ मजल दरमजल करीत राहाता तालुक्यात भंटकती करणारे शेतमजूर...