अहमदनगर : टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.टेंभुर्णी (जि. लातूर) येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना ३० डिसेंबर २०१७ रोजी घडली. या प्रकरणी टेंभुर्णी येथे वडार समाजाचा विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेला महिना लोटला तरी अद्याप आरोपी मोकाट आहेत. या घटनेच्या निषेधार्थ, तसेच पीडितेला न्याय मिळावा, यासाठी मंगळवारी सकाळी माळीवाडा येथील शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.पिडीत मुलीच्या मारेक-यांना पाठिशी घालणा-या पोलीस अधिका-यांना निलंबीत करा, या घटनेतील आरोपी व त्यांच्या नातेवाईकांची नार्को चाचणी करावी, या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करून न्यायालयीन चौकशी करावी, आरोपींना पाठिशी घालणा-या धनदांडग्या राजकीय पुढा-यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा अनेक मागण्या मोर्चेक-यांनी निवेदनात केल्या आहेत. जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, राकेश विटकर, मुकूंद पवार, रमेश जेठे, डॉ. श्रावण रॅपनवाड, दिलीप गुंजाळ, संदिप कुसाळकर, संपत गायकवाड, सागर कुसमोडे आदींसह वडारसमाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
टेंभूर्णी येथील अल्पवयीन मुलीच्या मारेक-यांना फाशी द्या; वडार समाजाचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:18 PM