सन्मतीवाणीचिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल. पैशाचा किंवा आरोग्याचा भरवसा नसतो. परिवार देखील नेहमी सुख देईल याची शाश्वती नसते म्हणून जितके जास्त पुण्य करता येईल त्यावरच आपले सुख अवलंबून आहे.ज्यांच्याकडे धन असून देखील परोपकारवृत्ती नसेल तर ते फक्त व्यावहारीकदृष्ट्या श्रीमंत आहेत. अंतरंगातून मात्र ते गरीब आहे. पाप, पुण्याचा चांगला परिणाम दिसून येतो. पाप- पुण्य आपण स्वत:च करतो. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पुण्य हवे असेल तर दान किंवा शुभयोग आवश्यक असतात. काही लोकांना पाप करताना भीती वाटत नाही. अखेर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्या उत्पन्नाचा काही भाग दान करण्यासाठी बाजूला काढून ठेवावा त्यामुळे पुण्य वाढते. ज्यांना खरेच गरज आहे त्यांनाच दान करावे. म्हणजे त्याचा सदुपयोग होतो. पैसा साठवून ठेवू नका. दान केला तर सदुपयोग होईल. पण जर एखादेवेळी आयकर खात्याची धाड पडली तर ते पैसे सरकार जमा होतील. त्यापेक्षा गरजूंना दान करणे महत्त्वाचे आहे. पुण्यानुबंध व पापनुबंध पुण्य असे पुण्याचे दोन प्रकार आहेत. पुण्यातून पुण्य वाढविणे यालाच पुण्यानुबंध म्हणतात. पण पुण्यातून पापाची कर्म केली तर त्याचा उपयोग होत नाही. संत संगत, ज्ञानाचे चिंतन केले तर पुण्य लाभते. पुण्यांचे महत्त्व जाणून घ्या आणि पुण्य वाढविण्याचा प्रयत्न करा. - पू. श्री. सन्मती महाराज
सुखाची प्राप्ती पुण्यामुळेच होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:54 PM