- बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीची धुम जोरात चालू आहे. या निवडणुकीत सत्तेसाठी कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला जात आहे. पण कर्ज बाजारीपणा व दुष्काळाच्या जीवघेण्या संकटामुळे बळीराजाला आपल्या मुलीचे लग्न करणे डोईजड झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे जनावरांच्या एका छावणीत गुरुवारी दुपारी रखरखत्या उन्हात विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थिताचे डोळे आनंदाने डबडबले.मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत ८११ जनावरे आहेत. शेतकऱ्यांच्या धनलक्ष्मीच्या उपस्थितीत मांडवगण येथील कै. किसन नाना जाधव यांचे चिरंजीव अनिल व औरंगाबाद येथील मारुती देवराम वानखेडे यांची कन्या पुजा यांनी लग्नाची रेशीमगाठी बांधली.नवदाम्पत्यांच्या खरची परिस्थिती हालाखिचीच आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन युवक कार्यकर्ते महेश तोगे यांनी हा विवाह मांडवगण जनावरांच्या छावणीत करण्याची संकल्पना मांडली. दोन्ही परिवाराने मान्यता दिली. श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी भोजनाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गरीब कुटुंबातील वधू वरांच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यात आल्या. यावेळी वधू वरांना सिद्धेश्वर देशमुख, बाळासाहेब लोखंडे, विठ्ठलराव वाडगे यांनी शुभेच्छा दिल्या.
मांडवगण येथे सेवाभावी वृत्तीने जनावरांची छावणी सुरू केली छावणीत दररोज देवीची आरती सर्व शेतकºयांना व निराधार जेवणाची व्यवस्था केली आहे छावणीत पहिला विवाह करण्याचे भाग्य लाभले छावणीत लवकरच संतकथा सुरू करणार आहे आणखी विवाह छावणीत करण्याचा मानस आहे-विठ्ठलराव वाडगे, अध्यक्ष वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट श्रीगोंदा
मांडवगण येथील जनावरांच्या छावणीत विवाह करण्याचा उपक्रम राबविला आहे इतर छावणी चालकांनी सामाजिक जाणिवेतून असे उपक्रम राबवून शेतकरी व गोरगरिब नागरिकांना दिलासा दिला पाहिजे- महेंद्र महाजन, तहसिलदार श्रीगोंदा
दुष्काळामुळे आमचा विवाह शाही थाटात करणे घरच्यांना शक्य नव्हते अशा परिस्थितीत जनावरांच्या छावणीत विवाह झाला वैवाहिक जीवनाची सुरुवात छावणीत झाली अतिशय समाधान वाटले़- अनिल व पुजा, नवदाम्पत्य